शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ
Wild Vegetables Kartoli Spiny Gourd: पावसाळ्यात रानभाज्यांची लज्जत काही औरच लागते. रानभाज्या केवळ बहुगुणीच नसतात. तर त्यातील औषधी गुणधर्मामुळे अनेक आजार छुमंतर होतात. या भाज्या अनेक आजारांवर रामबाण उपाय मानल्या जातात. मराठवाड्यातील करटोली अशीच शहरी जीवनाचा भाग होत आहे.

Wild Vegetables Kartoli Spiny Gourd: पावसाळ्यात रानभाज्यांची मोठी मागणी असते. शहरी भागात या खास भाज्यांचं मोठं आकर्षण असतं. ग्रामीण भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या भाज्या पूर्वी उगवायच्या. आता त्याची शेती केली जाते. मराठवाड्यात या रानभाज्यांचे लागवड क्षेत्र वाढले आहे. शहरातील खवय्यांना रुचकर आणि आगळीवेगळी चव आणणाऱ्या या रानभाज्या बहुगुणी आहेत. मधुमेह, सर्दी-पडसं ते मुळव्याधीपर्यंत विविध आजारांवर या रानभाज्या रामबाण उपाय मानल्या जातात. त्यांचा रोजाच्या आहारात वापर केल्यास औषधी घेण्याची गरज पडत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईत मराठवाड्यातील करटोलीने खास जागा पटकावली आहे.
देभेगावातून करटोलीचे कॅरेट शहराकडे
छत्रपती संभाजानगर जिल्ह्यातील देभेगावात यंदा येथे 150 एकरावर करटोलीची लागवड करण्यात आली आहे. दर आठवड्याला या गावातून 20 ते 25 क्विंटल करटोली पुण्यासह इतर शहरात पाठवली जाते. या रानभाजीची चव शहरी लोकांनाही आवडत असल्याने तिची मागणी वाढली आहे. तसे तिचे लागवड क्षेत्रही गेल्या वर्षाच्या प्रमाणात अधिक झाले आहे.
300-400 रुपये किलो दर
रानभाज्या एका हंगामात येतात. त्यांचा कालावधी मोठा नसतो. कन्नड तालुक्यातील देभेगावात यंदा मोठ्या क्षेत्रावर करटोलीची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या रानभाजीसाठी किलोमागे 300-400 रुपये दर मिळत आहे. औषधी गुणधर्मामुळे या भाजीला मागणी अधिक आहे. करटोलीचे पीक अवघ्या दोन महिन्यात हाती येते. जून ते नोव्हेंबर या कालावधीत या पिकांची शेती करण्यात येते. त्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन होतेच. त्यांच्या उत्पन्नातही मोठी भर पडते. दर आठवड्याला करटोलीचा एक तोडा होतो. त्यातून कास्तकाराची चांगली कमाई होते.
बियाणे झाले स्वस्त
गेल्यावर्षी देभेगावातील राजू खंडागळे यांनी 20 गुंठ्यांतच करटोलीचे पिक घेतले होते. बांबू, तार, जाळी आणि फवारणीचा खर्च वगळता त्यांना गेल्यावर्षी 29 क्विंटल उत्पादन झाले होते. यंदा त्यांनी करटोली लागवड क्षेत्रफळ वाढवले आहे. तर गेल्यावर्षी त्यांनी 15 हजार रुपये किलो दराने करटोलीचे बियाणे विकत घेतले होते. यंदा क्षेत्र वाढवल्याने त्यांना 5 ते 6 हजार रुपये दराने बियाणे उपलब्ध झाले.
बहुगुणी रानभाजी, या आजारांवर रामबाण उपाय
कृषी विभागाकडून पावसाळ्यात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येतो. त्यात अनेक रानभाज्या विक्रीला येतात. स्थानिक ग्राहक त्या खरेदी करतात. करटोली ही डोकेदुखी, मूतखडा, मूळव्याध, मधूमेह, हत्तीपाय, ताप, दमा, उष्णतेचा त्रास, उचकी लागणे आदी आजारांवर गुणकारी मानली जाते. तर करटोलीमुळे पाचनतंत्र सुधारते. शरीरातील दाह कमी होतो. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारावर ती गुणकारी मानली जाते. यंदा मराठवाड्यातील काही पट्ट्यात शेतकऱ्यांनी रानभाज्यांचा प्रयोग करून पाहिला आहे.
