BJP : सोलापूरमध्ये ‘ऑपरेशन लोट्स’; अजितदादांच्या राष्ट्रवादीला भाजपचा मोठा धक्का, हे दोन माजी आमदार गळाला
Operation Lotus in Solapur : अपेक्षेप्रमाणे सोलापुरात भाजपने अजितदादांच्या राष्ट्रवादीला जोर का झटका दिला. मित्रपक्षावरच कुरघोडी करण्याची संधी भाजपने टाळली नाही तर साधली अशी चर्चा सोलापुरात सुरू आहे. आता राष्ट्रवादी याचा हिशेब कुठं चुकता करते हे लवकरच समजेल.

Rajan Patil and Yashwant Mane left NCP : सोलापुरात भाजपने ऑपरेशन लोट्स राबवले. ज्याची चर्चा होती. ते प्रत्यक्षात घडले. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहावा यासाठी भाजपने पहिली खेळी खेळली. मित्रपक्षावरच कुरघोडी करण्याची संधी भाजपने साधली. राष्ट्रवादीला मोठा झटका दिला. सोलापुरात शिंदे सेनेतील कुरबूर सुद्धा चव्हट्यावर आली होती. त्यानंतर आता येथे हुक्कमी एक्का होण्यासाठी भाजपने मोठा डाव टाकल्याची चर्चा सुरू आहे.
सोलापूरमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का
सोलापूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गळाला दोन माजी आमदार लागले. राजन पाटील आणि यशवंत माने या दोन माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला. लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला. माजी आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्रही भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. भाजप आगामी निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे. तर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते आता भाजपसोबत महायुती धर्माचं कसं पालनं करणार असा सवाल विचारला जात आहे.
राष्ट्रवादीतील गटबाजीवर तोंडसुख
यावेळी राजन पाटील आणि यशवंत माने या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीतील गटबाजीवर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यामुळे जाता जाता त्यांनी पक्षातील वाद चव्हाट्यावर आणल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी पक्षात आता शिस्त राहिली नाही, म्हणून पक्ष सोडला अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. भाजप आता सोलापूरमय झाला आहे. भाजप सोलापुरात एकटं लढलं तर कमळ फुलेल असा दावा त्यांनी केला. जर महायुतीत लढलो तर बाकी लोकांना फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मतदार संघातील कुरघोडीमुळे कंटाळलो होतो. आमदार असताना चांगली वागणूक पण आमदार नसताना वेगळी वागणूक मिळत असल्याचा आरोप माजी आमदार यशवंत माने यांनी केला. मतदार संघातील विकासासाठी निधी सुद्धा मिळत नव्हता म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निणर्य घेतल्याची बाजू त्यांनी मांडली.
कुणालाही धक्का दिला नाही
तर या धक्कातंत्रावर मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. आम्ही कोणाला धक्का दिला नाही, असे ते म्हणाले. महायुतीत कोणतेही वितुष्ट येणार नाही. ज्या लोकांना आमच्याकडे यायचं आहे. ते लोक येत आहेत. स्वतःहून येणाऱ्या लोकांना आम्ही घेत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती बाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे गोरे यांनी स्पष्ट केले.
