मोदी भय्या म्हणत महिलेने गायलं छट गीत, पंतप्रधान मोदींनी शेअर केला खास व्हिडीओ
येत्या 25 ऑक्टोबर 2025 पासून नहाय-खाय विधीने छट पूजा उत्सवाला सुरुवात होत आहे. या पवित्र पर्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छट पूजा गीत अभियान सुरू केले आहे.
बिहारसह संपूर्ण देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर छट पूजा उत्सवाला येत्या २५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरुवात आहे. या उत्सवाला नहाय-खाय या विधीने सुरुवात होणार आहे. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशसह जगभरातील भारतीय समुदायात हा चार दिवसांचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. चार दिवस आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास गीत अभियान सुरू केले आहे. या अभियानात देशवासीय उत्साहाने सहभागी होत आहेत.
खास मोहीम सुरू
या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक खास मोहीम सुरू केली आहे. प्रकृती आणि संस्कृतीला समर्पित छट पर्व जवळ आले आहे. छठी देवीची गीते या सणाचे पावित्र्य वाढवतात. या गीतांमुळे पवित्र पर्वाचे महत्त्व आणि भव्यता अधिक वाढते. माझी देशवासियांना विनंती आहे की, आपणही छट पूजेशी संबंधित गीते माझ्यासोबत शेअर करा. मी पुढील काही दिवसांत ही गीते सर्व देशवासियांसोबत शेअर करेन, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
प्रकृति और संस्कृति को समर्पित महापर्व छठ आने वाला है। बिहार सहित देशभर में इसकी तैयारियों में श्रद्धालु पूरे भक्ति-भाव से जुट चुके हैं। छठी मइया के गीत इस पावन अवसर की भव्यता और दिव्यता को और बढ़ाने वाले होते हैं। आपसे आग्रह है कि आप भी छठ पूजा से जुड़े गीत मेरे साथ शेयर करें।…
— Narendra Modi (@narendramodi) October 24, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भावनिक आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी विविध गाणे शेअर केली आहेत. यावेळी एका महिलेने आपल्या छट गीतात मोदी भय्या म्हणत मोदींच्या नावाचा उल्लेख करत प्रेमाने गाणे गायले आहे. या गाण्याद्वारे त्यांनी आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. या अभियानामुळे सणासुदीच्या वातावरणात गीत-संगीताचे महत्त्व आणखी वाढले आहे. तसेच लोकसंस्कृतीला नवी दिशा मिळाली आहे.
छट पर्वाचे महत्व आणि स्वरूप
छट पूजा हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि कठीण व्रत मानले जातो. हा सण प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात साजरा होतो. पवित्रता, निसर्गाप्रती कृतज्ञता आणि सूर्य देवाची आराधना हे या व्रताचे मूळ आहे. सत्ययुग आणि द्वापर युगापासून चालत आलेला हा उत्सव सूर्योपासनेचा सर्वात प्राचीन प्रकार मानला जातो. या काळात महिला उपवास करतात. या उपवास करणाऱ्या महिलांना या काळात कठोर नियमांचे पालन करावे लागते. तसेच संतान सुख, आरोग्य तसेच समृद्धीसाठी जवळपास ३६ तास निर्जळी उपवास करतात.