अखेर शिंदेंचा महापौर होणार? दबक्या आवाजात…पडद्यामागे मोठ्या घडामोडी; नेमकं काय घडतंय?
KDMC Mayor : केडीएमसीच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र निकालानंतर महापौर कोण होणार याबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये वाद आहेत. आता याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र निकालानंतर महापौर कोण होणार याबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु असल्याची बातमी समोर आली आहे. या महापालिकेत शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आल्याने, महापौर पदावर दोन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे. त्यातच आता आगरी समाजाचा महापौर व्हावा, अशी मागणी नगरसेवकांकडून दबक्या आवाजात होताना दिसत आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असून, 22 तारखेला होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
दबक्या आवाजातील चर्चा काय?
कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्याकडे ठेवली आहे. महापालिकेतील एकूण 122 जागांपैकी शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना स्वतःला मोठा भाऊ मानत असली, तरी भाजपनेही महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे. दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची यादी मोठी असली, तरी वरून अद्याप निर्णय न झाल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रम आहे. अशातच आता आगरी समाजाचा महापौर व्हावा, अशी चर्चा आगरी नगरसेवकांमध्ये सुरू आहे.
22 तारखेला आरक्षण सोडत होणार
कल्याण–डोंबिवली महापालिकेत चौथ्यांदा सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले शिवसेनेचे नगरसेवक जयवंत भोईर यांचेही नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे. जयवंत भोईर यांनी सांगितले की, कल्याण–डोंबिवलीत तब्बल 14 हजार मताधिक्य मिळालं असून महापौर पद आम्हालाच मिळावं, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र 22 तारखेला आरक्षण सोडत झाल्यानंतर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल.
शिवसेना महापौर पदासाठी उत्सुक
शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे हे देखील महापौर पदासाठी चर्चेत असून महिला आरक्षण पडल्यास त्यांची पत्नी अस्मिता मोरे इच्छुक आहे असे त्यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. शिवसेनेकडून महापौर पदावर दावा ठाम असला तरी भाजपदेखील आक्रमक भूमिकेत आहे. नगरसेवक महेश पाटील यांनी सांगितलं की, महापौर कोणाचा याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भाजपचा स्ट्राईक रेट जास्त असून महायुतीतून भाजपचा महापौर बसावा ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
भाजपही आग्रही
भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटलं की, ‘केडीएमसीमध्ये भाजपचाच महापौर बसावा ही माझी पहिल्यापासूनची मागणी आहे.’ दरम्यान आता महापौर पदाबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतर होणार आहे.
