IND vs PAK: कॅप्टन सूर्याला पाकिस्तान विरुद्ध इतिहास घडवण्याची संधी, टीम इंडिया 3 दशकांनंतर करुन दाखवणार?
Indian Cricket Team Asia Cup 2025 Final : टीम इंडिया आशिया कप जिंकणार की नाही? हे आता काही तासांतच स्पष्ट होणार आहे. अंतिम फेरीत टीम इंडिया आशिया कप ट्रॉफीसाठी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे.

सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून आशिया कप 2025 स्पर्धेत स्वत:ला सिद्ध केलं. सूर्यासाठी टी 20I कर्णधार म्हणून आशिया कप ही पहिलीच मोठी स्पर्धा आहे. सूर्याने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. सूर्याने आपल्या नेतृत्वात भारताला सलग 6 सामने जिंकून देत अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं. आता टीम इंडिया अंतिम फेरीत विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा आणि सूर्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा आशिया चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाली आहे.
टीम इंडिया अंतिम फेरीत आशिया कप जिंकण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. महाअंतिम सामना दुबईत होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेप्रमाणे रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. कॅप्टन सूर्याला आणि टीम इंडियाला हा सामना जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. भारताकडे अंतिम फेरीत विजय मिळवून 3 दशकांची प्रतिक्षा संपवण्याची संधी आहे.
टीम इंडियाने 30 वर्षांआधी काय केलं होतं?
टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतली सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने 16 पैकी 8 वेळा आशिया कप जिंकला होता. भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांशिवाय 30 वर्षांआधी 1995 साली आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली होताी. तेव्हा या जोडीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं नव्हतं. टीम इंडियाने त्यानंतर 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. रोहित-विराट या दोघांपैकी कुणीतरी एक या पाचही वेळा आशिया कप विजेत्या संघाचे सदस्य होते.
विराट आणि रोहित या दोघांनीही टी 20I क्रिकेटमधून 2024 च्या वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्ती घेतली होती. तर यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे हे दोघे भारतीय संघाचा भाग नाहीत. मात्र या दोघांशिवायही टीम इंडिया अंतिम फेरीत पोहचलीय. आता टीम इंडिया आशिया चॅम्पियन होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे टीम इंडिया आता सूर्याच्या नेतृत्वात रोहित-विराटशिवाय 30 वर्षांनंतर पुन्हा एकदा आशिया कप जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
टीम इंडियाचा विजयी झंझावात
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या कर्णधारपदात साखळी आणि सुपर 4 फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीत अनुक्रमे यूएई, पाकिस्तान आणि ओमानवर मात केली. त्यानंतर भारताने सुपर 4 फेरीत पाकिस्तान, बांगलादेशनंतर श्रीलंकेवर मात करत विजयी षटकार लगावला.
