एवढी निर्लज्ज, नमक हराम व्यक्ती आयुष्यात पाहिली नाही; एकनाथ शिंदेंविषयी आदित्य ठाकरे काय म्हणाले?
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाह: केलं ते आपण सर्वांनी पाहिलंय. म्हणूनच मी हातवारे केले, टाचण्या-टोचण्याबाबत हो केले मी हातवारे, माझ्यावर करा कारवाई असे म्हणत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्र्यांइतके नमक हराम, गद्दार, एहसान फरामोश व्यक्ती पाहिले नाहीत. यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी आयुष्यात पाहिला नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी नाव न घेता थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. अधिवेशनाच्या शेटवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आज सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये प्रस्ताव मांडला, मात्र यावेळी बोलताना त्यांना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बाहेर येत पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर घणाघाती टीका केली.
