Ahmedabad Plane Crash : चूक कोणाची? 40 सेकंदात विमान कोसळलं, शेवटच्या क्षणी दोन्ही पायलटमध्ये काय झालं बोलणं?
अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय. टेकऑफनंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले. काही सेकंदातच इंजिन बंद पडल्याने विमान कोसळलं. विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाल्याने अपघात झाल्याचं एआयबीच्या प्राथमिक अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. अहमदाबाद विमान अपघातामध्ये वैमानिकाची कोणतीही चूक नसल्याचं देखील समोर आलेलं आहे.
अहमदाबाद विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आलाय. प्राथमिक तपासानुसार उड्डाणानंतर काही सेकंदातच विमानाचं इंधन कटऑफ स्विच एका पाठोपाठ एक बंद झालं. त्यामुळे विमानाला होणारा इंधन पुरवठा थांबला. इंधन पुरवठा थांबल्याने विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. यानंतर पायलटने लगेचच मेडे कॉल दिला. विमान 625 फूट उंचीवर असताना विमानाकडून एटीसीला शेवटचा सिग्नल मिळाला. या दरम्यान दोन्ही वैमानिकांमध्ये झालेले संभाषण सुद्धा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधून समोर आलंय.
तुम्ही इंजिन बंद का केलं? असा प्रश्न एका वैमानिकान दुसऱ्या वैमानिकाला विचारला. त्यावर मी काहीच केलं नाही असं उत्तर दुसऱ्या वैमानिकाने दिलं. वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. विमानाचे एक इंजिन काही प्रमाणात सुरूही झालं पण दुसरं इंजिन सुरू होऊ शकलं नाही. इंधनपुरवठा बंद झाल्याने विमान कोसळलं.
विमानाच्या इंधनामध्ये कोणतीही समस्या नव्हती. विमानाला उड्डाणाच्या वेळेला कोणताही पक्षी धडकलेला नव्हता. अपघाताच्या वेळेला आकाश पूर्णपणे निरभ्र होतं. दृश्यमानता चांगली होती. वाऱ्यासारखी कोणतीही परिस्थिती नव्हती. दोन्ही वैमानिक वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त होते. वैमानिकाला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. सहवैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यामुळे अपघाताला वैमानिक जबाबदार नसल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आलय.
