फडणवीसांमुळे घड्याळ अन् धनुष्यबाणाला मतं… सुरेश धसांच्या दाव्यानं महायुतीत तुझं माझं जमेना…

फडणवीसांमुळे घड्याळ अन् धनुष्यबाणाला मतं… सुरेश धसांच्या दाव्यानं महायुतीत तुझं माझं जमेना…

| Updated on: Feb 24, 2025 | 10:58 AM

दिल्लीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात रंगलेली फटकेबाजी आणि राज्यात सुरेश धस यांनी केलेला दावा यामुळे महायुतीत चाललंय तरी काय असा प्रश्न पडतोय.

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सुप आज वाजलं. तीन दिवस चाललेल्या मराठी साहित्य संमेलनात राजकीय फटकेबाजी रंगली. साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र व्यासपीठावर आले. त्यावेळी अजित पवार यांनी शिंदेंना उद्देशून एक मुश्किल वक्तव्य केलं. शिंदे म्हणाले मला हलक्यात घेऊ नका पण ते नेमकं कोणाला म्हणाले, असा सवाल अजित पवार यांनी विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर शिंदे यांनीही आपलं हे वक्तव्य अडीच वर्षांपूर्वीसाठीच होतं असं उत्तर दिले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत बोलताना दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असं वक्तव्य केलं होतं. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी परंड्यात बोलताना फडणवीसांमुळे धनुष्यबाण आणि घड्याळ यांना मत पडल्याचा दावा केला. आमचे लोक कधीही घड्याळाला मत देत नाहीत पण फडणवीसांमुळे सगळ्यांनी घड्याळ आणि बाण हाणला असं धस म्हणाले. ‘देवेंद्र फडणवीस एक चेहरा आहे इमानदार आहे याच्याकडे महाराष्ट्राला दिला पाहिजे. या प्रमुख मागणीमुळं लोकांनी आमच्याबरोबर घड्याळ निवडून दिलं. आमच्याबरोबर बाण हाणला अजिबात माग पुढे बघायचं नाही. बाणाला घड्याळाला आमच्या लोकांनी मत देऊ शकतात का?’, असा सवाल धसांनी केलाय. एकीकडे दिल्लीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील हास्य विनोद दुसरीकडे सुरेश धस यांचा हा दावा त्यामुळे महायुतीत तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असेच काहीतरी सुरू असल्याचं दिसतंय.

Published on: Feb 24, 2025 10:58 AM