Ajit Pawar : सासरा पळून पळून कुठे जाणार आहे? राजेंद्र हगवणेला शोधून मुसक्या आवळण्याच्या अजितदादांच्या सूचना
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली असून राजेंद्र हगवणेच्या मुसक्या अवळण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत.
मला शक्य असेल तेवढ्या कार्यक्रमांना मी जाण्याचा प्रयत्न करत असतो. कार्यकर्ते, पदाधिकारी मला बोलवतात. मी जातो. लग्नात जातो. पण नंतर जर कोणी सुनेला त्रास देत असेल तर त्यात अजित पवारचा काय दोष? मी त्यांना असं करायला सांगतो का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना उपस्थित केला आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे अजित पवार स्वत: या लग्नात देखील उपस्थित होते. त्यावर सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना आज अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजेंद्र हगवणे याच्यावर कठोर कारवाई करत त्याची पक्षातून हकालपट्टी देखील केलेली आहे. हगवणेसारखे नालायक माणसं माझ्या पक्षात नको, असंही यावेळी अजितदादांनी म्हंटलं.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ही घटना घडल्याचं समजताच मी स्वत पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांना फोनकरून या प्रकरणात दोषी कोणीही असलं तरी कारवाई करा, असं सांगितलं होतं. वैष्णवीची सासू, नवरा, नणंद सध्या जेलमध्ये आहेत. सासरासुद्धा पळून पळून कुठे जाणार आहे? त्याच्या मुसक्या आवळा असं मी पोलिसांना सांगितलं आहे, असंही अजितदादांनी सांगितलं.
