शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली! शिंदेंसोबतच्या युतीवर आनंदराज आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया
रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना - रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा आज झाली आहे.
आमची युती आजची नाही, बाबासाहेबांपासून आणि प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरू झालेली ही युती आहे, असं रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी म्हंटलं आहे. रिपब्लिकन सेना प्रमुख आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – रिपब्लिकन सेनेच्या युतीची औपचारिक घोषणा आज झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा आज एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आनंदराज आंबेडकर हे संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे या आघाडीची माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी म्हंटलं की, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आलोय. मी मुद्दाम कार्यकर्ते बोललो कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीशई त्यांच्या सुखदु:खाशी एकरुप होण्याचा प्रयत्न केला, असं आनंदराज आंबेडकर म्हणाले.
