Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव, ‘तो’ बडा नेता कोण?
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेल्याचा आरोप असून, याप्रकरणी बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याचा दावा जरांगेंनी केला असून, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कटासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली गेली होती. या प्रकरणी जालना पोलिसांनी बीड जिल्ह्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दावा केला आहे की, अटक केलेल्या संशयित आरोपींनी पोलीस चौकशीदरम्यान एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतले आहे. मात्र, हा बडा नेता कोण, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी ही कारवाई केली. बीड शहरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गुप्त बैठकांमध्ये हा कट शिजल्याचा आणि सुपारी निश्चित झाल्याचा आरोप आहे. या बैठकांमध्ये उपस्थित असलेल्या जरांगे पाटील यांच्या ओळखीच्या काही व्यक्तींनीच ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती.
या घटनेनंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांनी जालनाच्या पोलीस अधीक्षकांशी भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या कटामागे नक्की कोण आहे आणि हत्येचा नेमका कट कसा रचला गेला, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
