कोलकत्ता ते बदलापूर… जनतेचा संताप, चीड अन् आक्रोश, बदलापुरात गुन्ह्यास दिरंगाई का? उद्रेकाची ‘ही’ 4 कारणं
बदलापूरमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले आणि त्याचे पडसाद काल दिवसभर पाहायला मिळाले. याच धक्कादायक घटनेचा निषेध व्यक्त कऱण्यासाठी बदलापुरकरांनी थेट रेल्वे रूळावर उतरत तब्बल दहा तास रेल रोको आंदोलन केलं.
कोलकत्ता असो की बदलापूर.. सगळीकडे एकच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळतेय. तर अद्याप भय इथलं संपत नाही, अशीच काहिशी परिस्थिती देशात झाली आहे. पश्चिम बंगाल ते महाराष्ट्रातलं बदलापूर मुलींवरच्या अत्याचारावरुन दोन्ही राज्यात मोठा उद्रेक उसळलाय. बंगालमध्ये रुग्णालयातच तरुणी डॉक्टरची सामूहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या केली गेली. इकडे बदलापुरात एका शाळेत साडे ३ वर्षांच्या चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झालं. त्यावरुन दोन्ही घटनेविरोधात सामान्यांच आक्रोश उफाळून आला. दोन्ही घटनेत पोलिसांच्या दिरंगाईवर प्रश्न उभे राहिले. दोन्ही ठिकाणी राजकीय दबावापोटी पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप झाला. पश्चिम बंगालच्या घटनेवरुन सत्ताधारी भाजप विरोधकांना घेरत होते. आता विरोधक बंगालच्या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना सवाल करतायत. भाजपच्या चित्रा वाघांसहीत अनेकांनी कोलकातातल्या घटनेवरुन मोर्चा काढला होता. आता बदलापूरच्या घटनेबद्दल त्यांनी पोलिसांना गृहमंत्री फडणवीसांनी योग्य कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं म्हटलंय. मात्र बदलापुरातले लोक इतके आक्रमक का झाले. पोलिसांनी कुणाच्या आदेशावरुन तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केली. याचा छडा अद्याप लागलेला नाही. बदलापुरात घडलं काय आणि इतका असंतोष का उफाळून आला ते समजून घेऊयात.
