Bachchu kadu : मत कोणालाही द्या, पण..; बच्चू कडूंची आजपासून ‘7/12 कोरा’ यात्रा

Bachchu kadu : मत कोणालाही द्या, पण..; बच्चू कडूंची आजपासून ‘7/12 कोरा’ यात्रा

| Updated on: Jul 07, 2025 | 10:05 AM

Bachchu kadu Protest : माजी आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 7/12 कोरा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मभूमी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पापळ गावापासून या यात्रेचा प्रारंभ होणार आहे. ही सात दिवसांची पदयात्रा 138 किलोमीटरचे अंतर पायी पार करत उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज या गावांमधून प्रवास करेल. देशातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवलेल्या चिलगव्हाण गावात या यात्रेचा समारोप होईल.

बच्चू कडू यांनी सांगितले की, विधानसभेच्या अधिवेशनात अनेक मंत्र्यांच्या बैठका झाल्या, परंतु कर्जमाफीची तारीख जाहीर झाली नाही. शासनाचा ठोस निर्णय न झाल्याने ही पदयात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि आंदोलनाची तीव्रता कायम राहावी, यासाठी हा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात, नोंदवल्या गेल्या आहेत.

कडू यांनी पुढे म्हटले, आम्ही आता जाती, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र येण्याचे आणि कर्जमाफीसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मत कोणालाही द्या, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक व्हा, असेही त्यांनी नमूद केले.

Published on: Jul 07, 2025 10:05 AM