आशिष शेलारांच्या नेतृत्त्वात भाजपचे निलंबित आमदार राज्यपालांना भेटणार
गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. हे आमदार राज्यपालांना भेटून वस्तुस्थिती मांडतानाच ठाकरे सरकारची तक्रारही करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुंबई: गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. हे आमदार राज्यपालांना भेटून वस्तुस्थिती मांडतानाच ठाकरे सरकारची तक्रारही करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते. परिणामी या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. आता हे आमदार आज संध्याकाळी पावणे सहा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागणार आहेत. त्याबाबत भाजपची बैठक सुरू झाली असून त्यात पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आशिष शेलार यांच्यासह भाजपचे निलंबित 12 आमदार महाविकास आघाडीच्या कामाची तक्रार करणार आहेत.
