सरकारला घाम फुटत नाही, हे दुर्दैव; अजित पवार सरकारवर बरसले

| Updated on: Mar 20, 2023 | 12:46 PM

अजित पवार यांनी, महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. अवकाळी आणि गारपिटीमुळे अक्षरशः फळबागांचा नुकसान झालेलं आहे. तर मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यूसह 100च्या आसपास पशूधनाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे

Follow us on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. आज अधिवेशनात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक झाले. तसेच त्यांनी सभा त्याग देखील केला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत आमदार संजय गायकवाड आणि शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच सुनावले.

यावेळी अजित पवार यांनी, महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. अवकाळी आणि गारपिटीमुळे अक्षरशः फळबागांचा नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 100च्या आसपास पशूधनाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, कर्मचारीही संपावर आहे.

त्यामुळे सरकारने तातडीने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. मात्र, सरकार या मुद्दयांवर गंभीर दिसत नाही. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, अशावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी समंजस भूमिका घेतली पाहीजे. मात्र, सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड हे 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे, असे वक्तव्य करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान पाहायला मिळतंय, शेतकरी उध्वस्त झालेला पहायला मिळत आहे. सरकारला मात्र घाम फुटत नाही. हे या सरकारचं दुर्दैव आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.