Jarange vs Bhujbal : मुंबईला आंदोलन करणारच… जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच म्हणाले, काहीही कर पण…
मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कायद्याच्या चौकटीतील मागण्यांना सरकारचं समर्थन असणार आहे. एकंदरीत, मराठा आरक्षणाच्या या आंदोलनामुळे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यानंतर, मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, येत्या गणेशोत्सवादरम्यान म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईत दाखल होणार आहेत. “कोणीही आडवं आलं तरी थांबणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या इशाऱ्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “त्याला कोण आडवं येत आहे? पाहिजे तिथे आंदोलन कर.. जालन्यात कर, अंतरवाली सराटीत कर. मुंबईत कर नाहीतर दिल्लीत कर.” भुजबळ यांनी जरांगे यांना संविधानाने दिलेल्या अधिकारांची आठवण करून देत उपोषण कर, भाषण कर पण नियमात कर, असं सांगत जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलंय. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी एक समतोल भूमिका मांडत असे म्हटले की, “प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं, कारण गणेशोत्सव आहे.” मुंबईतील गर्दी आणि नागरिकांना होणारा संभाव्य त्रास लक्षात घेऊन प्रशासन नियोजन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. “नागरिकांसह आंदोलकांना त्रास होऊ नये, असं प्रशासनाचं नियोजन असणार आहे.”
