Devendra Fadnavis : सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
CJS Bhushan Gavai : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधानमंडळात सन्मान करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधानमंडळात सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. मुख्यमंत्र्यांनी गवई यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा उल्लेख केला.
फडणवीस म्हणाले, हा सत्कार केवळ विधानमंडळाचा नसून, महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या वतीने आहे. सत्काराबाबत विचारणा केली असता, गवई यांनी साधा सत्कार नको, तर संविधानावर मार्गदर्शनाची संधी द्यावी, अशी विनंती केली. हा त्यांचा साधेपणा दर्शवतो. दादासाहेब गवई यांच्यासारखे अजातशत्रू असण्याचा गुण भूषण गवई यांनी आत्मसात केला आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरन्यायाधीश झाल्यावरही गवई यांनी साधेपणा सोडला नाही. नागपूरमध्ये सरकारी वकिल असताना झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला होता, तेव्हा गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन तो प्रश्न सोडवला. मुंबई उच्च न्यायालयात असताना त्यांनी कायदा आणि जनहित यांचा समतोल साधत अनेकदा मार्ग काढले. वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामे अडकली होती, पण गवई यांनी त्यातून तोडगा काढला. उच्च न्यायालयात असताना ते नेहमी वकिलांच्या बाजूने उभे राहिले. आजही वकिलांचे मतदान घेतले तर त्यांना तीन चतुर्थांश मते मिळतील, असे फडणवीस म्हणाले.
