Eknath Shinde : यंदा पाऊसच लवकर आलाय, त्यामुळे..; पालकमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद
Eknath Shinde Press Conference : मुंबईसह उपनगरात झालेल्या मुसळधार पावसानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
राज्यासह मुंबई आज पहाटेपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. तब्बल 69 वर्षांनी पावसाने वेळेच्या आधीच हजेरी लावलेली आहे. मात्र पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दैना केली आहे. पावसाने झोडपल्याने मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झालेली बघायला मिळाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री देशाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण परिस्थितीची माहिती आज पत्रकारांना दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दरवर्षी पाऊस जूनच्या 10 तारखेपर्यंत येतो. मात्र यंदा पाऊसच लवकर आलाय. कंट्रोल रूममधून सर्व स्पॉट पाहिलेले आहेत. ज्या भागात पाणी साचले आहे, तिथे पाणी काढण्यासाठी पंपाची व्यवस्था केलेली आहे. नरीमन पॉइंटला २५२ मीमी पाऊस पडला. महापालिका मुख्यालयात २१४ मीमी पडला. ५०-५० मीमी पावसाची अपेक्षा असलेल्या ठिकाणी जास्त पाऊस पडला. त्यामुळे ढगफुटीसारखं झालं. पण आता सर्व सुरळीत झालं आहे. वाहतूक सुरळीत झाली असल्याचं देखील शिंदे यांनी सांगितलं आहे.
