Eknath Shinde : बेशिस्तपणा… शिरसाट अन् गायकवाडांवर शिंदे नाराज, आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान
संजय शिरसाट आणि संजय गायकवाड या दोन्ही नेत्यांच्या वागणुकीमुळे आणि विधानांमुळे शिंदे गटाची आणि पर्यायाने सरकारची प्रतिमा डागाळत असल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे यांनी या दोघांनाही कडक शब्दांत समज दिल्याचे बोलले जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि मंत्री संजय शिरसाट यांची कानउघडणी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या अलीकडच्या काही कृती आणि विधानांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. संजय गायकवाड आणि संजय शिरसाट हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत.
आमदार निवास येथील कॅन्टीनमध्ये जेवणाच्या दर्जावरून कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप संजय गायकवाड यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हाही दाखल झाला आहे. तर दुसरीकडे संजय शिरसाटांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये ते बेडवर सिगारेट ओढताना दिसत असून, त्याच बेडखाली नोटांनी भरलेली बॅग असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
