Gunratna Sadavarte : भूलभुलैया, ठणठण गोपाळ…काय फरक पडणारे? ठाकरे बंधू पुन्हा एकत्र सदावर्ते थेट म्हणाले…
नुकताच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पाहिला मिळाला. यावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. नुकताच काल २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा ६५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे. अशातच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘जोर जबरदस्तीने कोणाला शुभेच्छा देण्यात काही अर्थ नाही. राजकारणाचा ठणठण गोपाळ झालाय.’, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय. पुढे ते असेही म्हणाले, काय फरक पडणारे एकत्र राहिल्याने आणि विभक्त राहिल्याने.. आज हिंदुस्तान एका उंचीवर गेलाय. महाराष्ट्रातील माणूस शहाणा झालाय त्यामुळे या भुलभुलैय्यामध्ये कोणी येणार नाही. या दोघांचा राजकारणात ठणठण गोपाल झालाय, असं म्हणत सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
