माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच खसखस पिकली !
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त षण्मुखानंद हॉल येथे एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले होते. राज ठाकरे यांनी यावेळी बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या.
राज ठाकरे यावेळी म्हणाले की ‘निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते. सर्दी खोकला वगैरे. मी ताणून धरलं होतं. मलाही ताप खोकला सर्दी झाली. आजही चालूच आहे ते… मी त्यांना म्हटलं मला फार बोलता येणार नाही. कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेले. सोमवार, मंगळवार असं सुरू आहे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की,’ माझे फॅमिली डॉक्टर आहेत. डॉक्टर यादव म्हणून. मराठी यादव हां… मी त्यांच्याकडून औषधे घेतली. उद्धवना दिली.ते दोन दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडून सहा दिवस घेतोय, अजून काही नाही. मी परवा यांना फोन केला म्हटलं, माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला काय? आयला आतापर्यंत मला लागू पडायचा असे वक्तव्य राज यांनी करताच सभागृहात एकच हशा पिकला. राज यावेळी म्हणाले की आजापासून बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय. सामनात माझा आज एक लेख आला आहे. मी त्यात त्यांच्याविषयी अनेक आठवणी लिहिल्या आहेत. खरंतर त्या व्यक्तीला कसं पाहायचं. कसं मांडायचं हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं. व्यंगचित्रकार म्हणून मांडायचं की शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट म्हणून मांडायचं. त्यांच्यावर बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो. मी आणि उद्धव तुमच्याशी तास न् तास बोलू शकतो असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
