अशा आरोपांना घाबरत नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांचं मोठं विधान
नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने मतदारांच्या चोरीबाबतच्या आरोपांना खोडून काढले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, सर्व पक्षांना समान वागणूक दिली जाते आणि आयोग कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करत नाही. असे आरोप करणाऱ्यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. आयोगाचे दरवाजे सर्वानी खुले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले की, आमच्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा भेद नाही; सर्व राजकीय पक्षांना समान वागणूक दिली जाते.”
त्यांनी पुढे सांगितले की, जर त्रुटी दूर करण्यासाठी वेळेत अर्ज केले गेले नाहीत आणि नंतर ‘मत चोरी’सारखे चुकीचे शब्द वापरून जनतेची दिशाभूल केली गेली, तर हा लोकशाहीचा अवमान आहे. काहींनी मत चोरीचे आरोप केले, परंतु पुरावे मागितल्यावर त्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. निवडणूक आयोग अशा आरोपांना घाबरत नाही, असंही निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी म्हंटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत म्हटले होते, मतांची चोरी होत आहे, आणि यात निवडणूक आयोगाचा सहभाग आहे. याचे पुरावे आमच्याकडे असून, हे सर्व भाजपच्या सांगण्यावरून होत आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, निवडणूक आयोगाचे दरवाजे सर्वांसाठी नेहमीच खुले आहेत. प्रत्यक्षात, सर्व मतदार, राजकीय पक्ष आणि बूथ-स्तरीय अधिकारी पारदर्शकपणे एकत्र काम करतात. ते पडताळणी, स्वाक्षरी आणि व्हिडिओ प्रशंसापत्रांद्वारे प्रक्रियेत सहभागी होतात.
