BrahMos Missiles : आपरेशन सिंदूरअंतर्गत 15 ब्रह्मोसचा मारा अन् पाकचं कंबरडं मोडलं, राजनाथ सिंह म्हणाले रात के अंधेरे में उजाला…
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत होता. म्हणूनच तो भारतावर हल्ला करण्याचे सतत अयशस्वी प्रयत्न करत होता. तो हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत होता. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान भारताने पाकवर १५ ब्रह्मोस डागले होते, अशी माहिती आता समोर येत आहे.ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून पाकिस्तानच्या एअरबेसवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात १५ ब्रह्मोस मिसाईलचा जोरदार मारा केला होता. २५० ते ४०० किलोमीटर या मिडीयम रेंजच्या मिसाईलचा हवेतूनच मारा करण्यात आला. पाकिस्तानवर भारताकडून करण्यात आलेल्या ब्रह्मोसच्या माऱ्यानं पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त करून त्यांचे चांगलंच कंबरडं मोडलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले आणि त्यांनी सैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. राजनाथ सिंह म्हणाले, भारत केवळ परदेशातून निर्यात होणाऱ्या शस्त्रांवर अवलंबून नाही. आपल्या देशात बनवलेली शस्त्रे देखील अचूक आणि अभेद्य आहेत. पाकिस्तानने स्वतः ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ताकद मान्य केली आहे. भारताने पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले आहेत. रात्रीच्या अंधारात ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला प्रकाश दाखवला आहे. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि डीआरडीओने विकसित केलेल्या यंत्रणेने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
