Jammu Kashmir : भारतीय सैन्यानं पाकचा ड्रोन हल्ला उधळला, ड्रोनचे भाग छतावर; घराचं मोठं नुकसान… व्हिडीओ बघताच धडकी भरेल
ड्रोन हल्ल्यांदरम्यान सीमावर्ती गावांचे मोठे नुकसान झाले आहे. एका गावातील एका घराच्या स्वयंपाकघरात ड्रोन हल्ल्याद्वारे गोळीबार केला मात्र त्यावेळी स्वयंपाकघरात कोणीही नव्हते. पण हल्ल्यामुळे घराच्या भिंती, छप्पर आणि इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून युद्धबंदीवर सहमती झाल्यानंतरही पाकिस्तानकडून भारतीय सीमेलगतच्या गावात ड्रोनने हल्ले करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील सांबा गावात एक पाकिस्तानी ड्रोन पाडला आहे. ड्रोनचे काही भाग कैंक, गगवाल, सांबा गावातील घरांच्या छतावर पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा कऱण्यात आल्यानंतरही पाकिस्तानकडून दोन ते तीन वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी रात्री ८ वाजेच्या भाषणाच्या साधारण अर्धातास आधी पाकिस्तानकडून एकामागून एक अनेक ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते निष्क्रिय केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण सांबाच्या मुख्य चौकात स्थानिक पाहत होते. यावर नागरिकांची चर्चा सुरू असताना अचानक पाकिस्तानने ड्रोन हल्ले सुरू केले आणि त्यानंतर लोकांची एकच पळापळ झाली. तर ड्रोन हल्ल्यानंतर घराची काय अवस्था झाली त्याचे व्हिडीओ समोर आले आहे.
