Kalyan Political Shift: कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ अन्…

| Updated on: Dec 22, 2025 | 12:45 PM

कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विकासाचा अभाव, घराणेशाही आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे नाराज असलेल्या या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला आगामी महापालिका निवडणुकीत किंगमेकर बनवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपने अनेक वर्षांपासून काम करणारे कार्यकर्ते, तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कल्याण पश्चिमेमधील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले की, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशा तिन्ही पक्षांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत आहेत. भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी पक्षातील घराणेशाही, जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याचे धोरण आणि विकासाचा अभाव ही प्रमुख कारणे दिली.

कल्याण-डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या नरक यातना अर्थात रस्त्यांचे प्रश्न व अन्य समस्या आणि संविधानाशी सुसंगत नसलेले निर्णय यामुळे त्यांची घुसमट होत होती, असे त्यांनी नमूद केले. एका माजी भाजप सरचिटणीसांनी सांगितले की, भाजपमध्ये मन की बात होत होती, जन की बात नाही. तर शिवसेना शिंदे गटातील एका विभागप्रमुखांनी गेली ३८ वर्षे शिवसेनेसाठी काम करूनही दखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली. या पक्षप्रवेशांमुळे काँग्रेस आगामी महानगरपालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावेल, अशी चर्चा आहे.

Published on: Dec 22, 2025 12:44 PM