Manikrao Kokate: एक्का, दुर्री, तिर्री… सभागृहातच रमी, कोकाटेंवरून वादंग, जाहिरात स्किपसाठी 18 सेकंद अन् विरोधकांनी घेरलं
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेल्या असताना सभागृहात एक्का दुर्री तिर्रीच्या रमीच्या डावावरून वाद रंगलेला आहे. रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यानंतर मात्र आपण पत्ते नव्हे तर जाहिरात स्किप करत होतो असं उत्तर माणिकराव कोकाटे यांनी दिलंय.
कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी म्हणणारे मंत्री कोकाटे नव्या वादात सापडले. अधिवेशनाच्या वेळेला सभागृहात मंत्री कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे त्यामुळे एकीकडे शेती कर्जमाफीच्या वाद्यावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणं पुसली गेली असताना सभागृहात कृषीमंत्र्यांनी पत्त्यांचा डाव मांडल्यावरून संताप व्यक्त होतोय. आव्हाडांनी रमीमास्टर कृषीमंत्री विसरा शेती, खेळा रमी, मिळणार नाही शेतमालाची हमी असं पोस्टर शेअर करत टीका केली. तर कोणी तीस दिवसात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा टाकून दुसरीकडे कृषीमंत्री पत्ते खेळत असल्याची टीका केली आहे.
मात्र आपण पत्त्यांचा गेम खेळत नसल्याचा दावा कोकाटेंनी केलाय पण त्यांचं स्पष्टीकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की जणू नेमकं ते करत काय होते याबद्दल स्वतः कोकाटे संभ्रमात दिसताय. कोकाटे आधी म्हणतात की युट्यूब वरचा व्हिडिओ बघताना पत्त्याच्या गेमची जाहिरात आली होती मी फक्त ती जाहिरात स्किप करत होतो. कोकाटेंचा दुसरा दावा आहे की मोबाईलमध्ये डाऊनलोड झालेला गेम मी स्किप करत होतो तेव्हाच व्हिडिओ काढला गेला. पुन्हा कोकाटे म्हणतात की लोकांना युट्यूबवर जंगली रमीच्या जाहिराती येत नाहीत का त्यात गैर काय? कोकाटेंचं चौथं स्पष्टीकरण आहे की कोणीतरी माझ्या मोबाईलमध्ये पत्त्यांचा गेम डाऊनलोड केला असावा तोच युट्यूबमध्ये सुरू झाल्याने मी बंद करत होतो.
