Malegaon Blast 2008 : कोठडीत अपमान, मारहाण… 17 वर्षात पहिल्यांदा मी आनंदी… कोर्टासमोर साध्वी प्रज्ञासिंह यांना कोसळलं रडू
२००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) न्यायालयाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. १७ वर्षे चाललेल्या या खटल्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपींवर आरोप सिद्ध झाले नाहीत. .
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. १७ वर्षांच्या लांबलेल्या खटल्याचा निकाल आल्यानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष केला. कोर्टाने स्पष्ट केले की, कोणत्याही आरोपीच्या सहभागासंदर्भात पुरेसे पुरावे सादर केले गेले नाहीत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींनी अनेक वर्षे अडचणींचा सामना केल्याचे नमूद केले.
दरम्यान, कोर्टा समोर बोलताना साध्वी प्रज्ञासिंह यांना रडू कोसळलं. मला जेव्हा तपास यंत्रणांनी बोलावलं तेव्हा मी सहकार्याच्या भावनेने आले. पण मला पोलीस कोठडीत ठेवलं, माझा अपमान केला, मारहाण सुद्धा केली. माझ्या समाजात अपमान झाला. पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले तरीही लोक मला वाईट नजरेने बघायचे, माझा अपमान करायचे. माझ्यावरून भगव्या रंगाला सुद्धा कलंकित केलं गेलं, असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या. इतकंच नाहीतर पुढे त्या असंही म्हणाल्या, 17 वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले. अपमानाचं आयुष्य मी 17 वर्ष जगात होते. भगव्याला आतंकवाद बोललं गेलं आज भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला. ज्यांनी भगव्यावर अत्याचार केला देव त्यांना शिक्षा देईल. मी आता प्रसन्न आहे, आपले आभार मानते, धन्यवाद देते. पण निर्दोष सुटून सुद्धा आयुष्यात आतापर्यंत जे नुकसान झालेय त्याचं काय करायचं? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
