खातं गेलं, मंत्रिपद वाचलं; नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया काय?
सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आमदार माणिकराव कोकाटेंना कृषी खात्याचा कार्यभार सोडावा लागला आहे.
सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आमदार माणिकराव कोकाटे अडचणीत आले होते. यानंतर त्यांना अखेर कृषी खात्याचा कार्यभार सोडावा लागला आहे. विरोधी पक्षांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांचे मंत्रिपद कायम राहिले असले तरी, त्यांचे खाते बदलण्यात आले आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर त्यांच्याकडील कृषी खाते इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ खात्यांचा अदलाबदल केला आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांना, तर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते भरणे यांना देण्यात आले आहे. कृषीमंत्री बनल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, आज सकाळीच मला या निर्णयाची माहिती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पक्षाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी खाते मिळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे.
