त्यांना मराठा समाजाविषयी खून्नस! मनोज जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा

त्यांना मराठा समाजाविषयी खून्नस! मनोज जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा

| Updated on: Aug 24, 2025 | 3:21 PM

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. २९ ऑगस्टला मुंबईत मोठा मोर्चा काढण्याचा त्यांचा इरादा आहे. यापूर्वी बीडमध्ये इशारा बैठक घेण्यात येत आहे.

रामनाथ ढाकणे, प्रतिनिधी

ओबीसीमधून आरक्षण मिळाव यासाठी गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने उपोषण आणि आंदोलन करत मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत. आज बीड येथे जरांगे इशारा बैठक घेत आहेत. 29 ऑगस्टला मुंबईत धडक मोर्चा काढण्यावर ते ठाम असून तत्पूर्वी आज ते बीड जिल्ह्यात ही इशारा बैठक घेत आहेत. या बैठकी पूर्वी मनोज जरांगे यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सर्वांनी एकजुटीने मुंबईत यावे, ही समाजाच्या रक्षणाची जबाबदारी आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. सरकार आमच्या मागण्यांना प्रतिसाद देत नाही, पण आम्ही हार मानणार नाही.

जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले, फडणवीसांना मराठा समाजाविषयी खून्नस आहे. त्यांचे स्वप्न आहे की मराठ्यांचा नाश व्हावा, त्यांची मुले आत्महत्या करावी. पण आम्ही त्यांना गुडघ्यावर आणणार आहोत. त्यांनी सरकारला इशारा दिला की, 26 ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा 29 ऑगस्टला आम्ही आरक्षणाचा तुकडा पाडणार. त्यांनी चंद्रकांत पाटील आणि छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. भुजबळ हे फडणवीसांच्या सांगण्यावरून भुंकतात, त्यांना स्वतःला काही कळत नाही. ते भुंगारा आहेत. चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांचा राग आमच्यावर काढू नये, असे ते म्हणाले. तसेच, आरक्षण रोखण्यासाठी सरकार आणि काही नेते वर्षा निवासस्थानी कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जरांगे यांनी बैलांच्या खांद्याच्या बदलण्याच्या उपमेचा वापर करत शिंदे समितीतील सदस्य बदलण्यावरही टीका केली. आम्ही दोन दिवसांपूर्वी सरकारशी संपर्क साधला होता, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही तुमचीच लेकरं आहोत, आमची काय चूक आहे? असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. त्यांनी समाजाला 27 ऑगस्टपासून आंदोलनाची तयारी सुरू करण्याचे आणि 29 ऑगस्टला मुंबईत दाखल होण्याचे आवाहन केले.

Published on: Aug 24, 2025 03:19 PM