आर या पार? मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आज मोठी घोषणा करणार; सरकारची डोकेदुखी पुन्हा वाढणार?
मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड यांनी 22 मे रोजी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हं दिसत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड यांनी 22 मे रोजी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली होती. माध्यमांसमोर तसेच बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि उपोषणाची वेळ येणार नाही, असं आश्वासन प्रसाद लाड यांनी दिलं होतं.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटमची मुदत आता संपत आली असून राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. आमदार प्रसाद लाड यांनी आज प्रतिक्रिया देताना उद्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपण स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं. मराठा समाजाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून प्रशासकीय अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज सकाळी साडेदहा वाजता अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 31 मेपासून आमरण उपोषण सुरू होणार का, की आंदोलनाची नवी दिशा जाहीर केली जाणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. उन्हाळा, आगामी पावसाळा आणि शेतकऱ्यांची कामं लक्षात घेता जरांगे पाटील यांनी उपोषण टाळावं, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने मराठा समाजात नाराजी कायम असल्याचं चित्र दिसत आहे.
