MHADA Lottery 2025 : तुमचं हक्काचं घर ठाण्यात! म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच, ‘या’ भागात 2 हजार घरांसाठी सोडत
म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांना आता निराश होण्याचे कारण नाही. येत्या काही महिन्यांत म्हाडाचे कोकण मंडळ सुमारे २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे.
आता तुमच्या हक्काचं आणि स्वप्नातील घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी लवकरच ठाण्यात निघणार आहे. काही महिन्यात ठाण्यातील भागात साधारण दोन हजार घरांसाठी म्हाडा कोकण मंडळाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन सोडत काढल्या असून सुमारे दहा हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे. आता या वर्षी पुन्हा एकदा सुमारे दोन हजार घरांची सोडत काढण्याची कोकण मंडळाची तयारी आहे. म्हाडा कोकण मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या लॉटरीमध्ये ठाणे येथील चितळसरमध्ये सर्वाधिक 1 हजार 173 घरांचा समावेश असणार आहे. चितळसर येथे म्हाडाने 22 मजल्याच्या 7 इमारती तयार केल्या आहेत. पण या परिसराला पाणी आणि रस्त्याची समस्या आहे. ठाणे महानगर पालिकेने अद्याप या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने सोडतीचे काम रखडले आहे. हे ना हरकत प्रमाणपत्र मिळताच येथील घरे सुद्धा लॉटरीमध्ये येतील, अशी माहिती आहे.
