Anjali Damania : महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती, ‘त्या’ प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती
अजित पवारांच्या गटातल्या नजीब मुल्ला नावाच्या, कळवा- मुंब्रा येथील नेत्याने जमील शेख यांचा सुपारी देऊन खून करून घेतला असे पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असतांना, मी कारवाई करेन असे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण करावे, असे दमानिया म्हणाल्या.
मनसे पक्षात असलेले जमिल शेख, यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचा न्याय मागण्यासाठी त्याचा परिवार मुख्यमंत्र्यांकडे जात होते. त्यांच्या परिवाराच्या ११ लोकांना पोलिसांनी अटक करून, वरळी वरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू न देता परत पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला सवाल केलेत. वडिलांच्या हत्येसाठी न्याय मागणे गुन्हा आहे का? का मग आरोपी अजित पवारांच्या जवळचा नजीब मुल्ला आहे म्हणून न्याय मिळणार नाही? असा सवाल दमानियांनी केलाय. यासंदर्भात आज दमानिया यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दमानिया यांनी अजित पवारांचे निकटवर्ती नजीब मुल्ला यांच्यावर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी केली. तर मुख्यमंत्र्यांनी जमिल शेख या कुटुंबाला आश्वासन दिले होते ते त्यांनी तत्काळ पूर्ण करावे, असेही म्हटले.
महाराष्ट्रात किती गंभीर परिस्थिती होत चाललीये. एखाद्या व्यक्तीला गोळी घालून ठार केले तरी चालते. एखादा अधिकारी चांगली चौकशी करत असेल तर बदली केली जाते जर तुम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही, असेही दमानिया म्हणाले.
