Raj Thackeray : हे कसलं स्वातंत्र्य? स्वातंत्र्यदिनीच… 15 ऑगस्टला नॉनव्हेज बॅन! राज ठाकरेंनी स्पष्टच म्हटलं….
राज ठाकरे यांच्या मते, स्वातंत्र्य दिनी जर बंदी आणली जात असेल, तर ते स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखे आहे. "प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार खाण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे," असे मत त्यांनी मांडले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीतील मांसविक्रीवरील बंदीवर नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सरकारने आणलेल्या या बंदीला त्यांनी विरोध केला आहे. ‘एकाबाजूने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा पण खायचे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य दिनी जर तुम्ही कोणती बंदी आणत असाल तर हाच यात विरोधाभास आहे.’, असं वक्तव्य करत राज ठाकरे यांनी म्हटलंय. येत्या १५ ऑगस्ट रोजी अर्थात स्वातंत्र्य दिनाला कल्याण डोंबिवलीसह काही महानगरपालिकेने मांस विक्री आणि कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचं फर्मान जारी केलंय. यावर राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कल्याण डोंबिवलीतील मनसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांना ते चालू ठेवा असं मी सांगितलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे महापालिकेला हे अधिकार नाहीत कोणी काय खावं आणि काय खाऊ नये? याचे निर्णय महापालिका आणि सरकारने करू नयेत. स्वातंत्र्य म्हटल्यावर तुम्ही बंदी का आणताय, कोणाचे काय धर्म आहेत आणि सण आहेत, याप्रमाणे कोणी काय खावं हे कोणत्याच सरकारने सांगू नये. हा कायदा १९८८ चा आहे म्हणे.. तो तेव्हाचा कायदा असो की मग आताचा… स्वातंत्र्यदिनीच आपण लोकांचं स्वातंत्र हिरावून घेतोय. हा कोणता स्वातंत्र्य दिन? असा सवालही राज ठाकरे यांनी केलाय.
