Pratap Sarnaik : मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; शिंदेंचे मंत्री संतापले, भाजपला घरचा आहेर

Pratap Sarnaik : मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; शिंदेंचे मंत्री संतापले, भाजपला घरचा आहेर

| Updated on: Jul 08, 2025 | 11:04 AM

Mira Bhayandar MNS Morcha : मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड झाल्यानंतर आता शिंदेंच्या मंत्र्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यांनी मीरा-भाईंदरमध्ये आज मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होऊन मिरा रोड स्टेशनपर्यंत जाणार आहे. मात्र, पोलिसांनी मोर्चापूर्वीच मनसे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, मंगळवारी पहाटे 3:30 वाजता मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. वसई-विरारमधील इतर काही पदाधिकाऱ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तरीही, मनसेने मोर्चा काढण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे, ज्यामुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

दरम्यान, या कारवाईवर शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांशी बोललो असून, माझा निषेध नोंदवला आहे. गृहखात्याचे कोणतेही आदेश नसताना पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून ही धरपकड केली, याची चौकशी करत आहोत. सरनाईक यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली जाते, मग मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला का अडवले? या कारवाईमुळे महायुती सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आणि मीरा-भाईंदरमधील पोलिसांची कारवाई अत्यंत चुकीची असल्याचा थेट आरोप केला.

Published on: Jul 08, 2025 11:04 AM