मुंबई पालिकेसाठी शिवसेना – भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून, भाजपने १२८ तर शिवसेनेने (शिंदे गट) ७९ जागांवर एकमत केले आहे. उर्वरित २० जागांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत १०० जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. बारामतीत गौतम अदानींच्या हस्ते एआय सेंटरचे उद्घाटन झाले असून, पवार कुटुंबासोबत स्नेहभोजनही पार पडले.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महायुतीचे जागावाटप आज अंतिम होणार आहे. एकूण २२७ जागांपैकी २०७ जागांवर एकमत झाले असून, यामध्ये भाजपने १२८ जागांवर तर शिवसेनेने ७९ जागांवर समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित २० जागांबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, लवकरच त्यावरही तोडगा काढला जाईल असे कळते.
महायुतीचा निर्धार २२७ जागांवर निवडणूक लढवून १५० हून अधिक जागा जिंकून महायुतीचा महापौर निवडून आणण्याचा आहे. चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे सहभागी होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंतिम चर्चा अपेक्षित आहे.
दरम्यान, मुंबईत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर १०० जागा लढण्याची शक्यता आहे. या प्रचाराची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आणि शिंदे गटाने नवाब मलिक यांना सोबत घेण्यास विरोध दर्शवल्याने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला घेण्याचा सुनील तटकरे यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. तर ठाकरे बंधूंनी पवारांच्या राष्ट्रवादीला १६ जागांचा प्रस्ताव दिल्याचीही माहिती आहे.
