Mumbai Local Update : ठाणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांची एक अनाऊन्समेंट अन् भर पावसात प्रवाशांची धावाधाव… नेमंक घडलं काय?
ठाण्याहून CSMT कडे जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्याची घोषणा पोलिसांकडून करण्यात आली आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या २४ तासांपासून मुंबईत मुसळधार पावासाचा कहर पाहायला मिळतोय. या २४ तासात मुंबई आणि उपनगर भागात साधारण २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून मुंबई आणि मुंबईतील काही भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत पावसाचा जोर वाढत चालल्याचे पाहायला मिळतंय. मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचत असल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे तर काही मार्गावर ठप्प होण्याच्या स्थितीत आहे.
आज सकाळपासून होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) ते कुर्ला आणि मेन लाईनवरील कुर्ला ते सायन दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीला बसला यानंतर आता मध्य रेल्वे मार्गावरील ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने आणि मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. यानंतर रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांमध्ये एकच धावाधाव सुरू झाली.
