मोठी बातमी! मुंबई–पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अपडेट; मिसिंग लिंकवर दरड…
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, आता त्याचा मोठा फटका मुंबई–पुणे प्रवासालाही बसला आहे. सततच्या पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरड कोसळणे, पाणी साचणे आणि खराब हवामानामुळे प्रशासनाने दोन्ही दिशेतील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने आणि द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर पुणे–मुंबई लोहमार्गावरील ठाकूरवाडी परिसरातही दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून पुण्याकडे जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
महामार्ग आणि लोहमार्ग या दोन्ही मार्गांवर अडथळे निर्माण झाल्याने मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय मुंबई–पुणे प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, ज्यांनी प्रवासाचे नियोजन केले आहे त्यांनी तो पुढे ढकलावा, असेही सांगितले आहे.
दरम्यान, पुणे–मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, लोणावळ्यापासून तब्बल 35 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. गेल्या तीन तासांपासून घाट परिसरात वाहनांची संथ गतीने हालचाल सुरू असून, अनेक वाहनचालक महामार्गावरच अडकून पडले आहेत.
भारतीय हवामान विभागाने पुणे शहर आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना हवामान आणि वाहतूकविषयक अधिकृत सूचना तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, दरड हटविण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.