Nagpur : नागपुरात दुर्घटना…प्रसिद्ध कोराडी मंदिराचं गेट कोसळलं अन्…अनेकजण जखमी, नेमकं घडलं काय?
गेटचं काम सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. यात काही मजूर अडकले होते त्यांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी मााहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली.
नागपूरमधील प्रसिद्ध कोराडी मंदिराच्या परिसरात एका निर्माणाधीन गेटचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. शनिवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत १५ ते १७ मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि एनडीआरएफच्या (NDRF) टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या जेसीबीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस उपायुक्त स्वतः या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
