Honeytrap Scandal : हनी ट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, भर सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब, थेट नावं घेत…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. नाना पटोलेंनी भर विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवला. पटोले यांच्या या कृतीनंतर सत्ताधारी पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आणि हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे म्हटले.
राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती असून नाशिकचे काही वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असल्याची शंका व्यक्त केली जात असताना या प्रकरणी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरात गुप्त चौकशी आणि तपास सुरू करण्यात आलाय. अशातच विधानसभेतही हा मुद्दा चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी आज भर सभागृहात पेनड्राईव्ह दाखवून या प्रकरणाला नवी धार दिली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
नाना पटोले यांनी हनी ट्रॅपसारखा गंभीर विषय असताना सरकार याबाबत गंभीर नाही. नाशिक, मंत्रालय, ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बिंदू असल्याचे म्हटले. इतकंच नाहीतर त्यांच्याकडे भाजपच्या काही नेत्यांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा पेनड्राईव्ह त्यांनी सभागृहात उपस्थित आमदारांना दाखवला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. या पेनड्राईव्हमध्ये काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी, यामध्ये महत्त्वाचे खुलासे असल्याचा दावा त्यांनी केला.
