Nashik News : ठाकरेंच्या सेनेला नाशिकमध्ये खिंडार; आणखी एक बडा नेता सोडणार साथ
Uddhav Thackeray : नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातला आणखी एक बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार आहे.
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठं खिंडार सध्या पडलेलं दिसत आहे. सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे देखील शिंदे गटाच्या वाटेवर जाणार असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यासोबत आठ माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते व समर्थकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विलास शिंदे म्हणाले की, नवीन जिल्हाप्रमुख म्हणून ज्यांना नेमलं, त्यांच्या मागे कार्यकर्ते नाहीत, तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठीही मला उमेदवारी देण्यात आली नाही. माझी नाराजी मी खासदार संजय राऊत यांच्याकडे व्यक्त केली होती, मात्र त्यानंतर 15 दिवस उलटून गेले तरीही त्यावर काहीच हालचाल झाली नाही, अशा शब्दांत शिंदेंनी आपली नाराजी जाहीर केली आहे.
