Jayant Patil : 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला येऊन बसला हा महाराष्ट्राचा तोटा, जयंत पाटील शिंदेंबद्दल नेमकं काय बोलले?
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक नंबरचा माणूस दोन नंबरला अशी टिप्पणी करत टीका केली. लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसीमधील अनियमितता, लाभार्थ्यांच्या आकडेवारीतील तफावत आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरून झालेल्या वादविवादाभोवती सभागृहात चर्चा रंगली.
नागपूर येथील विधानसभा हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेवरून जोरदार चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, “एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला येऊन बसला, हा महाराष्ट्राचा तोटा झाला आहे,” असे म्हटले. या विधानामुळे सभागृहात राजकीय वातावरण तापले. योजनेतील ई-केवायसीच्या अनियमिततेवर आणि गैरव्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
जयंत पाटील यांनी विचारले की, चुकीची केवायसी भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार का. योजनेच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीमध्ये ॲप आणि पोर्टलवर दिसणाऱ्या तफावतीबद्दलही सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सरकारने अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामसेवक यांना फॉर्म भरण्याचे टार्गेट दिल्याचा आरोपही करण्यात आला, ज्यामुळे अनेक बोगस अर्ज भरले गेल्याचे म्हटले जात आहे. या गडबडीला जबाबदार कोण, असा प्रश्न विरोधी पक्षांनी विचारला आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की नोंदणीसाठी ॲप, पोर्टल आणि ऑफलाईन असे विविध पर्याय उपलब्ध होते आणि १.७४ कोटी महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे.
