Rohit Pawar : दादा फास्ट बॉलर, जयंत पाटील ऑफ स्पिनर अन् आम्ही नवखे खेळाडू जमेल तसा बॉल मारतो… रोहित पवारांची फटकेबाजी
'एनडी पाटील यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे कष्ट करणारं व्यक्तीमत्त्व. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटीलच्या संस्थेत शिक्षण घेतलं. तिथेच प्राध्यापक झाले. स्वत शाळेत जाऊन अडचणी सोडवायचे. महात्मा फुलेंना सावित्री माईंनी ताकद दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांना लक्ष्मीबाईंनी ताकद दिली. त्यांचाच वारसा विचाराचा वारसा पुढे घेऊन जातांना आमच्या माईंनी एनडी पाटलांना ताकद दिली. '
इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते हजर होते. या कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना रोहित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
‘अजितदादांच्या बाबत बोलायचं झालं, क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत. फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडची बॅटसमनला भीती वाटते. चंद्रकांतदादा इथे आहेत. कधी बॉलिंग करतात तर कधी बॅटिंग करतात. पण मीडियम पेस बॉलर आहेत. पण बॉलिंगही चांगली टाकतात. जयंत पाटलांबाबत बोलायचं झालं तर कधी ऑफ स्पिन टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात, कधी गुगली टाकतात. आणि कधी कधी बॉल हातातच असतो, पण बॅटसमनला वाटतं बॉलिंग टाकली’, असे रोहित पवार म्हणाले. तर पुढे रोहित पवार टोला लगावत असेही म्हणाले की, आमच्यासारखे नवखे खेळाडू व्यासपिठावर आहोत. हे अनुभवी खेळाडू बॉल टाकतात, आम्ही जमेल तसा बॉल मारण्याचा प्रयत्न करत असतो.
