Nivedita Saraf : निवेदिता सराफ कट्टर BJP समर्थक… बिहारच्या निकालाचा आनंद व्यक्त करत जाहीरपणे म्हणाल्या…
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे निवेदिता सराफ यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांच्या हस्ते हा सन्मान झाला. निवेदिता सराफ यांनी बालनाट्यापासूनच्या आपल्या अभिनय प्रवासाची आठवण करून दिली. तसेच, त्यांनी स्वतःला भाजपची कट्टर फॅन संबोधत बिहार निवडणुकीच्या निकालांबद्दल आनंद व्यक्त केला.
अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी बिहार निवडणुकीच्या निकालांबद्दल आनंद व्यक्त करत, मी भाजपची कट्टर फॅन आहे, असे विधान केले. यानंतर एकच चर्चांना उधाण आले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बालदिनाचे औचित्य साधून निवेदिता अशोक सराफ यांना गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी हे विधान केले. निवेदिता सराफ यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल निवेदिता सराफ यांनी आनंद व्यक्त करत, हा पुरस्कार म्हणजे माहेर आणि सासर दोन्हीकडील सन्मान असल्याची भावना व्यक्त केली.
पुरस्कार स्वीकारताना निवेदिता सराफ यांनी आपल्या बालनाट्यापासूनच्या अभिनयाच्या प्रवासाला उजाळा दिला. सुधा करमरकर यांना त्यांनी पहिली गुरु मानले आणि त्यांच्या लिटल थिएटर बालरंगभूमी या संस्थेतील बालनाट्यांच्या आठवणी सांगितल्या. बालनाट्ये ही काळाची गरज असून, त्यातून चांगले श्रोते आणि प्रेक्षक तयार होतात, असे त्या म्हणाल्या. दरम्यान अशोक सराफ यांनीही निवेदिता सराफ यांच्या कार्याचे कौतुक केले आणि ठाण्यातील प्रेक्षकांचे आभार मानले.
