Operation Sindoor : मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् लष्कर-ए-तैयबाचं हेडक्वॉर्टर उद्ध्वस्त, पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्याला आता आठवड्याहून अधिक काळ झाला आहे, परंतु पाकिस्तानचं वातावरण अजूनही तसंच आहे. भारताच्या एअर स्ट्राईकची पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे.
ऑपरेशन सिंदूरमधून भारताने स्पष्ट संदेश दिला की आम्ही केवळ दहशतवाद्यांना मारणार नाही तर त्यांच्या घरात घुसून त्यांच्या आकांवरही हल्ला करू आणि भारताने तेच केले. मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाचं हेडक्वॉर्टर भारतानं कसं उद्ध्वस्त केलं. यावर पाकिस्तानचा एक ग्राऊंड रिपोर्ट सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्या ठिकाणी भारताने हल्ला केला ती ठिकाणं देखील आजही ओसाड पडून असल्याचेच दिसतंय. अशातच पाकिस्तानच्या एका रिपोर्टरने भारताने केलेल्या हल्ल्यानंतर सध्यस्थिती काय आहे? याचं रिपोर्टिंग केलं आहे. पाकिस्तानच्या पत्रकाराने मुरीदके येथील नष्ट झालेले लष्कर-ए-तैयबा मुख्यालय कॅमेऱ्यासमोर अगदी जवळून दाखवले आहे. या व्हिडिओमध्येच भारताकडून कसा हल्ला करण्यात आला याची माहितीही त्याने दिली. पाकिस्तानी पत्रकाराने या उद्ध्वस्त इमारतीचे दृश्य सर्व बाजूंनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मरकजचा वरचा मजला पूर्णपणे कोसळल्याचे या व्हिडीओत दिसते. मरकजचे खांब, सळई आणि विटा तुटून विखुरल्या असून आता तिथे फक्त मलबा आणि ढिगारा उरला आहे. लोखंडी सळ्या इकडे तिकडे पसरलेल्या असून इथे येणं आता धोक्याचं असल्याचं पाकचा पत्रकार म्हणतोय.
