मेड इन इंडिया लष्करी सामर्थ्याचे नवे रूप जगासमोर आणले; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गगार
Parliament Monsoon Session 2025 : संसदेचे पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले. सभागृह सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संसदेचे पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले. सभागृह सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. भारतीय सैन्याने अवघ्या 22 मिनिटांत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, आणि जगाला भारताची लष्करी ताकद दाखवली.
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने 100% यश मिळवले आणि ‘मेड इन इंडिया’ लष्करी सामर्थ्याचे नवे रूप जगासमोर आणले. ते म्हणाले, पहलगाम हत्याकांडाने जगाला हादरवून सोडले. त्या वेळी सर्व पक्षांनी राजकीय हित बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र येत परदेश दौऱ्यांद्वारे दहशतवादाचा पाठीराखा असलेल्या पाकिस्तानला जागतिक व्यासपीठावर उघड केले. मोदींनी अंतराळवीर शुभांशू यांचेही अभिनंदन केले, ज्यांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) भारताचा तिरंगा फडकवला. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि इतर अनेक खासदार संसद भवनात दाखल झाले आहेत. ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीवरील दावे आणि बिहारच्या मतदार यादीसारख्या मुद्द्यांवर अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींवर विरोधक पंतप्रधानांकडून स्पष्ट उत्तरे मागणार आहेत.
