Parth Pawar Land Deal : नियम धाब्यावर अन् 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोपांच्या फैरी
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतनाच्या जमिनीच्या व्यवहारावरून पार्थ पवारांवर गंभीर आरोप झाले आहेत. 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी केल्याचा, तसेच मुद्रांक शुल्क न भरल्याचा दावा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून, काही अधिकाऱ्यांचे निलंबनही झाले आहे.
पुण्यातल्या उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरातील महार वतन जमिनीच्या कथित व्यवहारावरून पार्थ पवारांवर गंभीर आरोप झाले आहेत. बाजारभावानुसार 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीने केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. यात 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना, केवळ 500 रुपयांत नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. 1 लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीकडे 300 कोटी रुपये कसे आले, हा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक कारवाई म्हणून तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अजित पवारांवर कारवाईची मागणी केली आहे. पार्थ पवारांनी मात्र आपण कोणताही घोटाळा केला नसल्याचे म्हटले आहे.
