Maharashtra Rain : धुव्वाधार, कुठं घरासह शेतात पाणी तर कुठं रस्तेच पाण्याखाली, राज्यात कशी परिस्थिती?

Maharashtra Rain : धुव्वाधार, कुठं घरासह शेतात पाणी तर कुठं रस्तेच पाण्याखाली, राज्यात कशी परिस्थिती?

| Updated on: Jul 22, 2025 | 1:27 PM

वाशिमच्या पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे. पुरामुळे तीन मार्ग पाण्याखाली गेले आहेत. माजलगाव, पाटोदा, गेवराई, आंबेजोगाई आणि परळीसह अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात अनेक नदीनाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील अनेक नदीनाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत.

राज्यभरात मुसळधार पाऊस चांगलाच झोडपून काढत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. विदर्भामध्ये बुलढाणा आणि वाशीमला पावसाने झोडपलंय. मराठवाड्यामध्ये जालना, बीड, हिंगोलीत देखील दमदार पाऊस झाला आहे. कोकणात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झालाय. 27 जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईत देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. घरात पाणी शिरल्याने पांग्रा डोंगर गावात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या रिसोड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नदीकाठच्या शेतात पुराचं पाणी शिरलं. वाशिमच्या मंगळूर पीरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आणि नागरिकांना फटका बसला. जालन्याच्या अंगलगाव, शेलगाव आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. हिंगोलीमध्ये सरस्वती नदीला पूर आलाय. यात एका पुजार्‍यासह दोन भाविक पुरामध्ये अडकले. नदीपात्रात असलेल्या महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यामधल्या सरस्वती नदीला पूर आला. माजलगाव परिसरात सर्व नदीनाले दुथडी भरून वाहू लागले.

Published on: Jul 22, 2025 01:27 PM