Raj Thackeray Tweet : मला विचारल्या शिवाय .. ; राज ठाकरेंनी थेट ताकीदच दिली
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले की, त्यांनी स्वतःहून कोणत्याही माध्यमांशी संवाद साधू नये किंवा सोशल मीडियावर व्यक्तिगत प्रतिक्रिया व्यक्त करू नयेत.
राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे हा आदेश जारी करताना म्हटले, पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याने वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा डिजिटल माध्यमांशी बोलणे टाळावे. तसेच, स्वतःचे व्हिडीओ किंवा प्रतिक्रिया सोशल मीडियावर टाकू नयेत. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनीसुद्धा माझी परवानगी न घेता माध्यमांशी संवाद साधू नये किंवा सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये.
वरळीतील एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मनसे आणि शिवसेना (यूबीटी) युतीच्या चर्चांना उधाण आले आहे, परंतु युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याचवेळी, राज्यात मराठी विरुद्ध अमराठी असा वादही पेटला आहे, आणि मनसे या दोन्ही मुद्द्यांच्या केंद्रस्थानी आहे. काही कार्यकर्त्यांनी युतीच्या समर्थनार्थ विधाने केल्याने राज ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आणि मराठी-अमराठी वादावर आक्रमक भूमिका टाळण्यासाठी नेत्यांना माध्यमांशी संवाद साधण्यास मनाई केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
