MNS Mira Bhayandar Morcha : त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
Rajan Vichare : राजन विचारे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मनसेच्या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे देखील सहभागी झाले आहेत. आज सकाळपासूनच या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मराठी-अमराठीच्या वादात व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. मनसे नेते अविनाश जाधव यांना देखील पोलिसांनी पहाटे ताब्यात घेत पालघरच्या एका पोलिस ठाण्यात नेलं होतं. यावेळी झालेल्या धरपकडनंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. सकाळपासूनच सुरू असलेल्या या गडारोळानंतर अखेर वाढता जमाव बघता पोलिसांनी या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. आता या मोर्चात राजन विचारे देखील सहभागी झाले असून त्यांनी मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या शिंदेंच्या मंत्र्यांवर चांगलीच आगपाखड केलेली बघायला मिळाली आहे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी मनसेच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. मात्र ते आंदोलन स्थळी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने त्यांना याठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर विचारे यांनी सरनाईक यांना धारेवर धरत त्याला चपलेने मारलं पाहिजे. पाठिंबा द्यायचा असेल तर आधी राजीनामा द्या मग इथे या तेव्हाच कार्यकर्ते तुम्हाला स्वीकारतील अशी तिखट प्रतिक्रिया विचारे यांनी दिली आहे.
