Rohit Pawar Post : डोकं सुन्न झालंय… मन बर्फासारखं थिजलंय… दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची मनाला भिडणारी भावनिक पोस्ट
अजित पवार यांच्या निधनानंतर आज रोहित पवार यांनी एक भावनिक पोस्ट आपल्या सोशल मिडियावर शेअर केलेली आहे. दादा कुठे हरवलात, तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
दादा कुठे हरवलात, तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे ! अशी भावनिक पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आज अजित पवार यांच्या राख सावडण्याच्या विधीनंतर त्यांनी ही पोस्ट आपल्या सोशल मिडियावर शेअर केली आहे.
28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पवार कुटुंब देखील शोकसागरात बुडलेलं आहे. अशातच आज रोहित पवारांनी केलेल्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा सर्वांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हंटलं आहे की, अजित पवारांच्या निधनाची बातमी आल्यापासून आत्तापर्यंत डोकं सुन्न झालं आहे. सत्ता असो किंवा नसो कायमच तुमचा दरारा वाटायचा. अजित दादांनी विकासाची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं. डोकं सुन्न झालंय, मन बर्फासारखं थिजलंय, मनातलं विचारांचं काहूर अजून थांबलं नाही. सामान्यांसाठी वाऱ्याच्यावेगाने धावणारा पहाडासारखा माणूस एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? अशी खंत रोहित पवार यांनी आपल्या या पोस्टमध्ये केलेली बघायला मिळत आहे.
